कायदा जनजागरण अभियान
दैवी दहशतवादाला आळा घालण्यास कायदा हवाच!-डॉ. दाभोलकर
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिराळा (जि. सांगली) तालुका शाखेच्या वतीने अंधश्रद्धा कायदा जनजागरण अभियानाचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर होते. डॉ. दाभोलकर म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून जनजागरणाचे अभियान आम्ही कष्टाने, जिद्दीने राबवत आहोत. कायद्यात धर्म, श्रद्धा, देव याविषयी विरोध नाही. हा कायदा मानसिक गुलामगिरीतून मानवाला मुक्त करणारा आहे. कायद्याशिवाय चळवळ पुढे जाऊ शकणार नाही.
१९९५ साली अंधश्रद्धाविरोधी कायदा करणारे पहिले पुरोगामी राज्य असा ढोल महाराष्ट्राने वाजवला. पण कृतीसाठी पावले उचलली नाहीत. फुले आंबेडकरांचे नाव सांगून मताचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना हा कायदा व्हावा असे वाटत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याबाबत १६ वर्षे वनवास चालू आहे. फक्त सरकार याला जबाबदार आहे असे नाही. जनताही याला जबाबदार आहे, कारण जनतेने हे सरकार निवडून दिले आहे.
व्यापक जनचळवळीशिवाय कायदा होणे व अंमलबजावणी करणे शक्य नाही. दहशतवादाला कायदा आहे पण दैवी दहशतवादाला आळा घालण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र कायदा करु शकत नाही. हा कायदा झाल्याशिवाय महाराष्ट्रात विवेकवाद रुजणार नाही.
हा कायदा फक्त हिंदू धर्माविरुद्ध आहे अशी खोटी ओरड काही लोक करत आहेत. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अभिनेते निळू फुले म्हणाले, राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा व्हायला हवा. संतांनी नेहमीच अंधश्रद्धेवर हल्ला केला आहे. अंधश्रद्धेमुळे निर्दयपणे समाजाचे शोषण होत आहे, हे थांबले पाहिजे. प्रारंभी अनिल नलवडे यांनी साधूच्या वेषात मंत्राने अग्नी पेटविला. डॉ. नितीन जाधव व सहकाऱ्यांनी ‘हम होंगे कामयाब’ हे गीत सादर केले.
प्रास्ताविक प्रा.विजयकुमार जोखे यांनी केले. आभार डॉ. नितीन जाधव यांनी मानले. स्वागत अंनिस अध्यक्ष डॉ. प्रभाकर पाटील यांनी केले. साईनाथ मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास १५०० स्त्री पुरुष उपस्थित होते.
-विजयकुमार जोखे, शिराळा, जि.सांगली.