डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करणार आमदार मानसिंग नाईक : लायन्स क्लब शिराळातर्फे डॉक्टर्स डे
दै० सकाळ
शिराळा, ता. ५ : तालुक्यातील डॉक्टरांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकीतून वर्षातून
एकवेळ लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनच्या वतीने डॉक्टर्स डे झाला, त्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शिराळा लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रमोद नाईक होते.
श्री. नाईक म्हणाले, “जुन्या काळातील खडतर परिस्थितीही लोकांना चांगली सेवा देणारे डॉक्टर आहे.त्यांनी त्या परिस्थितीत लोकांना दिलेली आरोग्य सेवा विचारात घेता त्यांच्या कामाचा गौरव व्हावा, म्हणून त्यांच्या नावे विविध उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी समाजाला चांगल्या आरोग्याच्या सोयी द्याव्यात. ज्या घातक प्रवृत्ती वाढत आहेत त्यांना वेळीच आळा घालण्याची गरज समाज आणि डॉक्टर दोघांची आहे. तालुक्यात रक्तसंकलन केंद्र उभारण्याचा मानस आहे.”
डॉ. नितीन जाधव म्हणाले, “रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात आता दुरावा निर्माण होऊ लागला आहे. तो दुरावा कमी करण्याचा प्रयत्न सर्वांच्याकडून झाला पाहिजे. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्याची जबाबदारी डॉक्टरांबरोबर सामाजातीलप्रत्येक घटकाची आहे. सर्वानी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.रुग्ण आणि डॉक्टरांच्यात अनेकदा तेढ निर्माण होतात. समन्वयाची भूमिका घेऊन योग्य तोडगा निघावा म्हणून समाजातील विविधस्तरातील लोकांची एकत्रित एक समन्वय समिती स्थापन करणे गरजेचे आहे.” घनश्याम आवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रताप पाटील, अजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. श्रीकांत सागावकर, डॉ.आबासाहेब पाटील, डॉ. प्रभाकर पाटील,डॉ. कृष्णा जाधव, डॉ. क्षमा पाटील, डॉ.माया पाटील, डॉ. उमेश काकडे, डॉ. एस.वाय. कुरणे, डॉ. सुधीर देशपांडे, डॉ.बी. बी. माने, डॉ. साईनाथ पाटील, डॉ.अजिम मुल्ला आदी उपस्थित होते.