शिराळा तालुक्यातील ग्रामीण महिला रुग्णांशी डॉ. कृष्णा जाधव यांचा जास्त संपर्क आल्याने मोठ्या प्रमाणात असणारी अंधश्रद्धा त्यांनी जवळून पहिली. २५ वर्षांपूर्वी महिलांना केवळ औषधे देऊन उपयोग नव्हता. त्यांच्या मानेवरील अंधश्रद्धेचे भूत उतरवणे गरजेचे होते. त्यांनी समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अभिनेते निळू फुले, कॉम्रेड अॅड. गोविंद पानसरे यांच्यासमवेत कार्य केले आहे. तो अद्याप प्रा. विजयकुमार जोखे यांच्यासमवेत सुरु आहे.
‘बोले तैसा चाले’ अशी वागणारी माणसं हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असतात. ती ध्येयवेडी असतात. पैसा हेच सर्वस्व न मानता सामाजिक बांधिलकी जोपासणे ही खरी दौलत मानून काम करणारी माणसे आहेत. त्यापैकीच एक शिराळा येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. कृष्णा जाधव. त्यांचे शिराळा येथे आनंद हॉस्पिटल आहे. शालेय व वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले. त्या एम.बी.बी.एस. एम. डी.(स्त्रीरोगतज्ज्ञ) आहेत. वैद्यकीय शिक्षण घेत असताना शहराऐवजी ग्रामीण लोकांचीच सेवा करण्याची त्यांची इच्छा होती. सुदैवाने सन १९९६ मध्ये त्यांचा विवाह डॉ. नितीन जाधव यांच्याशी झाला. ग्रामीण भागात सासर व वैद्यकीय सेवेसाठी ग्रामीण भाग दोन्ही मिळाले. त्यांनी आयुष्याची नवी सुरवात केली.
पण हॉस्पिटल व कुटुंब एवढ्या पुरचे मर्यादित न राहता त्यापलीकडे जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. पती डॉ. नितीन जाधव यांची मोठी साथ मिळाली.
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, थायरॉईड, जुळी बाळे अशा गुंतागुंतीच्या आजारांसहित असलेल्या गरोदर मातांचे बाळंतपण यशस्वीपणे करीत आहेत. गर्भनलिकेत फुटलेला गर्भ, पिशवीला असणाऱ्या मोठ्या गाठी यांच्या शस्त्रक्रिया भूलतज्ज्ञ डॉ. रहीम मुल्ला व
डॉ. नितीन जाधव यांच्या सहकार्याने यशस्वी करून अनेकींना जीवनदान दिले आहे.
वंध्यत्वावर योग्य ते उपचार माफक दरात करून अनेक जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून दिला आहे. महिला रुग्णांशी जास्त संपर्क असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात असणारी अंधश्रद्धा जवळून पहिली. २५ वर्षांपूर्वी महिलांना औषधे देऊन उपयोग नव्हता. त्यांच्या मानेवरील अंधश्रद्धेचे भूत उतरवणे गरजेचे होते. त्यांनी समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हाती घेतले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अभिनेते निळू फुले, कॉम्रेड अॅड. गोविंद पानसरे यांच्यासमवेत कार्य केले आहे. तो अद्याप प्रा. विजयकुमार जोखे यांच्यासमवेत सुरु आहे. त्यावेळी स्त्रीभ्रूण हत्त्येबाबत जागरूकता नव्हती. त्यामुळे ‘लेक वाचवा’ हे अभियान हाती घेतले.
केवळ व्याख्यानातून विचारांचे डोस न पाजता स्वतः दोन मुलींवर कुटुंब मर्यादित ठेवून खऱ्या अर्थाने ‘लेक वाचवा’ अभियानला बळकटी दिली.
दोघेही डॉक्टर असले तरी त्यांनी मुलगा हवाच असा अट्टाहास धरला नाही. ‘मुलीला गर्भात मारू नका’ हा संदेश लोकांत रूजवण्यासाठी कार्यक्रमांनिमित्त शाळा, महाविद्यालये व गावोगावी प्रबोधन केले. महिला व मुलींसाठी मासिक पाळी व वयात येताना शरीरात होणारे बदल याबद्दलही प्रबोधन सुरु ठेवले आहे.
त्यांची मोठी मुलगी शरयू एम.एस्सी बायोटेक्नोलॉजी करून वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अंतर्गत पर्यावरण, जंगल, जंगली प्राणी, माणूस यांच्यावर अभ्यास करीत आहे. दुसरी मुलगी शर्वरी ही नागपूर येथे एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षात आहे.
त्यांनी स्वतःचे वाचनालय उत्तम प्रकारे सुरु केले आहे. घरात तांब्या. पितळ, लाकूड व इतर जुन्या वस्तूंचा पाहण्यासारखा संग्रह केला आहे. पर्यावरण प्रेमी म्हणून चांगले काम करीत आहेत. पर्यावरणरक्षण, प्रदूषण नियंत्रण, वनसंवर्धन, वृक्षारोपण हे उपक्रमही हाती घेतले आहेत. शिराळा येथे स्वतःच्या दहा गुंठे जागेत मियावाकी पद्धतीने कृत्रिम जंगल निर्माण केले आहे. त्याचा पहिला वाढदिवस दिमाखात केला. घराभोवती चारा पाण्याची सोय केल्याने पक्षांचा विशेषतः चिमण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
काव्यरचना हा छंदही जोपासला आहे. अनेक विषयांवरील रचना केल्या आहेत.
सध्या त्या शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत गोरक्षनाथ यात्रेसाठी आहेत. येणाऱ्या भविकांना उन्हाच्या तडाख्यात थंड पाणी मिळावे म्हणून हॉस्पिटलसमोरच पाणपोई सुरु करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सन २०१५ मध्ये त्यांना अपघात झाला. अनेक दिवस कोमात होत्या. अपघात भीषण होता. त्या वाचतील असे कोणालाही वाटत नव्हते. त्यांनी केलेली समाज सेवा व त्यातून मिळालेले लोकांचे आशीर्वाद या जोरावर त्या मृत्यूच्या दाढेतून परतल्या. पुनर्जन्म समजून त्या पुन्हा उमेदीने व त्याच विचाराने लोकसेवेत रुजू आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत आई, वडील, काका, काकू तसेच सासू सासरे, गुरुजन, रुग्ण, सर्व कुटुंबियांचे मोलाचे योगदान आहे.