पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती २०१८
शनिवार-रविवार १४१५ जुलै
अविस्मरणीय, साहसी, धाडशी, रमणीय, विलोभनीय शारीरीक आणि मानसिक कणखरपणाची कसोटी बघणारा, निसर्गाची विविध रूपे दाखवणारी ,माणसाचं खुजेपण अधोरेखित करणारी पदभ्रमंती. छ. शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, अभिमान, त्यांची दूरदृष्टी, चिकाटी, नियोजन यांची पदोपदी जाणीव करून देणारा एक रोमांचकारी अनुभव.
३५० वर्षांपूर्वी याच वाटेवरून महाराज पन्ह्याळगडावरून विशाळगडला ला रात्रभर प्रवास करून दुसऱया दिवशी सुखरुप पोहोचले, पण हि वाट किती अवघड, खडतर होती याची जाणीव आम्हाला भर दिवसा, क्षणाक्षणाला पावलोपावली होत होती आणि उर अभिमानाने भरून येत होता, अंगावर शहारे येत होते. स्वतः च्या प्राणाची आहुती देणारे शिवा काशीद घोडखिंड जीवात जीव असे पर्यंत लढवणारे बाजी प्रभू त्यांना साथ देणारे ३०० ते ३५० बांदल आणि इतर मावळे यांचा पराक्रम ऐकून, वाचून होतो पण त्याची प्रचिती याची देही याची डोळा अनुभवून कृतार्थ झालो.
पन्हाळगडावर बाजीप्रभूंच्या पुतळ्यासमोर सकाळी ८ वा. जमलेले ४०० ते ४५० लोक अगदी ६ वर्षाच्या मुलापासून ते ७० वयाच्या तरुण आजोबांपर्यंत चा सर्व निसर्गप्रेमी, शिवप्रेमींचा समुदाय आसमंतात असलेले धुके, अधून मधून बरसणारा पाऊस, जय शिवाजी जय भवानी च्या गर्जना, वातावरण एकदम भरून टाकणारे. आयोजकांनी पन्हाळगड पावनखिंडीचा इतिहास, पदभ्रमंतीचा मार्ग, घ्यावयाची काळजी, सूचना ई गोष्टी सांगितल्यानंतर पोहे व चहा घेऊन सर्व लोकांनी आपापली शिदोरी (२ चप्पात्या मटकीची भाजी )ताब्यात घेतली व पुन्हा एकदा जय शिवाजी जय भवानी चा घोष करून आमची मोहीम सुरु झाली. रेनकोट, पाठीवर सॅक, पायातील बूट, हातात काठी सावरत दिंडी दरवाजाने पायउतार होऊन मसाई पठार गाठत असताना हा ट्रेक किती खडतर असणार याची जाणीव झाली .
पठारावर चालत असताना वाऱ्याच्या झोताबरोबर दरीतून वर वर उडणारे पाण्याचे तुषार बघून नेत्र तृप्त झाले. मसाई पठारावरून डोंगर उतरून कुंभारवाडा गावा पर्यंत चे ५.५ ते ६ किमी अंतर यायला २.५ तास लागले. पुढे खोतवाडी पर्यंत पोहोचायला १ तास गेला साधारणतः २ वा खोतवाडीत आल्यावर एका जि. प. शाळेच्या आवारात बसून सर्वांनी दिलेली शिदोरी फस्त केली. २०/२५ मी. ची छोटी विश्रांती घेऊन पुढील वाटचाल सुरु झाली.
त्या अगोदर अधे मध्ये वाटेत बरोबर आणलेले चिक्की, चिवडा, राजगिरा लाडू, शेंगदाणे भडंग, गुळाच्या पोळ्या बाकरवडी ई. खाणं सुरूच होत. खोतवाडी पर्यंत असणारी वाट दगडातून खाचखळग्यातून, चिखलातून जाणारी चढ उताराची होती. माझ्या बरोबर आमच्या ग्रुप मध्ये डॉ प्रदीप, डॉ प्रभाकर, डॉ धनंजय पाटील,डॉ किरण भिंगार्डे,कराडच्या डॉ शरयू पती पत्नी, मुंबई पुण्याचे डॉ मित्र मैत्रिणी आणि माझी अर्धांगिनी सहचारिणी कृष्णा (जी सप्टें २०१५ ला अपघातानंतर १५ दिवस कोमात होती, तिच्या साहसाला जिद्दीला सलाम),अशी साधारणतः ४५ ते ६० वयोगटांतील १३ मंडळी ८ पु. तसेच ५ महिला असं आमचं छोटं पथक डॉ किरण आणि डॉ प्रदीप यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करीत होते. डॉ किरण गेली १५ वर्षे आणि डॉ प्रदीप ४ वर्ष हि मोहीम यशस्वीपणे करीत आहेत.
खोतवाडी ते आंबेवाडी, जिथं आमचा पहिला दिवसाचा मुक्काम होता, जवळपास ४ तासांची पायपीट वाटेत मंडलाईवाडी, किरपेवाडी अशी छोट्या वस्त्यांची गाव लागली. तिथले जीवनमान, माणसे बघून आपण दुर्गम आदिवासी खेड्यातून जात असल्याचा भास झाला काही ठिकाणी कच्चे रस्ते, पक्की घर होती, पण गरीबी पदोपदी जाणवत होती. लोक खूप समाधानी जीवन जगत होते. वाटेत पाण्याने भरलेली भाताची खाचरं, शेतात राबणाऱ्या डोईवर इरलं घेतलेल्या बाया बापड्या, बैल, म्हशी, रेडे यांना घेऊन काम करणारी माणसं लक्ष वेधून घेत होती. संयोजकांनी सांगितल्या प्रमाणे सर्व जण शेताच्या बांधावरून ओळीत शिस्तीने चालत होतो.
आंबेवाडीत पोहोचेपर्यंत १३ ते १४ छोटे मोठे ओहोळ, नाले ओढे पार करावे लागले. अधे मध्ये सोबतीला चिखल होताच फरक इतकाच कि कधी कमी कधी जास्त पाय चिखलात रुतत होते वाटेतल्या ओढ्यामध्ये बुटासकट धुवून निघत होते परत चिखलात नहात होते काही वेळा बूट रुतून बसून पायच बाहेर येत होता पायाखालची वाट तुडवत, आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत, अंगावर जोराचा पाऊस वारा झेलत आमची पहिल्या दिवसाची २२ ते २३ किमी ची भ्रमंती संध्याकाळी ६.३० वा. आंबेवाडी गावात थांबली. रेनकोट बूट धुवून ओसरीबाहेर ठेवले. सॅक उघडून कोरडे कपडे काढावे म्हटले तर ते निम्मे अर्धे भिजलेले. तसेच ओले अंगावर चढवून एका छोट्या घरातील खोलीत चटईवर बैठक मारली. स्वतःच्या हातानं पाय दाबत एकमेकांचे अनुभव ऐकत बसलो तेव्हड्यात चहा आला गरमागरम चहा सोबत, बरोबर नेलेली बिस्किटे खाल्ल्यावर ताजे तवाने वाटू लागले.
रात्री ८. ३० वा संयोजकांकडून गरम गरम भात, मसूर आमटी चा बेत होता. दिवसभर चालून दमलो असल्याने जेवण इतकं रुचकर आणि पोटभर झाले कि पंचपक्वान्न फिके पडावे . परत तासभर गप्पा मारून चटईवरच ताणून दिली. वाऱ्याचा आवाज, रात्रभर कोसळणारा पाऊस, कौलातून अंगावर पडणारे तुषार, ठणकणार अंग यामुळं अधे मध्ये जाग येत होती, एकमेकांना पाय लागत होते, काहीजण घोरत होते ( त्यांनी मान्य नाही केले ते सोडा), सकाळी ६ ते ६.३० पर्यंत सर्वजण उठलो आवरून बॅगा भरल्या, तेव्हड्यात चहा आला, क्रीम रोल बिस्किटे होतीच सोबतीला. कालच्याच ओल्या कपड्यांना पिळून अंगावर घातले व सर्वजण भिजलेले मोजे बूट घालून ८. ३० पर्यंत तयार झालो.
परत जय शिवाजी जय भवानी चा गजर आणि नव्या उत्साहात दुसऱ्यादिवशीच्या उर्वरीत मोहिमेस सुरुवात. वाटेतच १ व २ नं आटोपले.आजचा प्रवास आंबेवाडी ते पावनखिंड जवळपास २३/२४ किमी चा आजकालपेक्षा जास्त जोरात पाऊस, सोसाट्याचा वारा सोबतीला होता. वाटकालच्या सारखीच दगड धोंड्यांची चिखलाची, खाचखळग्यांचीओढ्यानाल्यांची.
कालच्या दिवशी कुंभारवाडी गावात येई पर्यंत कृष्णाच्या डाव्या बुटाचा सोल निघाला रुमाल बांधला, डॉ किरण यांनी छोट ऑपरेशन करून नायलॉन दोऱ्याने शिवून दिला पण आंबेवाडीत जाईपर्यंत कसाबसा तग धरला तोपर्यंत दुसऱ्या बुटाने आपला सोल सोडला . मग काय! पुढे वाटचाल कशी करायची. हा यक्ष प्रश्न, डॉ किरण नि त्यांच्या भावाला फोन करून ५ किंवा ६ न. चा नवीन बूट आणायला सांगितला, जो आम्हाला दुसऱ्या दिवशी २ तासांनी मिळाला, तो पर्यंत कृष्णा मोठ्या धैर्याने जुन्या सोल निघालेल्या बुटाने वाट तुडवीत होती असो. वाटेत एकमेकांना आधार देणं, खाऊ खाणं, नाल्यांचे झऱ्यांचे अति शुद्ध पाणी पिणं चालूच होत . एकमेकांना सांभाळत, गप्पा मारत, पूर्वीचे अनुभव ऐकत ऐकवत, जीवनातील चढ उतार, सुखः दुःखाचे प्रसंग एकमेकांना सांगत आगची भटकंती सुरु होती. निसर्गाची वेगवेगळी आल्हाददायक, सुंदर, धीरगंभीर, रौद्र, नयनरम्य, लोभस रूपे पावला पावलावर आम्हाला जाणवत होती.
वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज कानी पडत होते. अनेक रानफुले, वनस्पती, वेगवेगळी छोटी मोठी झाडे, विविधतेने नटलेले जंगल, वनराई डोळ्यांना सुखावत होती, अधून मधून पाऊस बरसत, गर्जत, कोसळत होता.निसर्गापुढे स्वतःतला गर्व, अभिमान, सुःखदुःख थिटे पडत होती, जगाचा विसर पडला होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आम्ही पावनखिंड, कासारी नदीचा उगम असणाऱ्या भागामध्ये पोहोचलो. सभोवतालच्या डोंगरावर ढग पाय उतार झाले होते, आजूबाजूला धुकं, पावसाची रिपरिप सुरूच होती. आता शासनातर्फे तेथे सुंदर स्मारक, पायऱ्या केल्या आहेत.
जवळच्या एका मंदिरात जेवणाची सोय केली होती. ओल्या कपड्यनिशी परत एकदा शिरा, भात, आमटी, पुरी ई. वर ताव मारला आणि आमच्या गाडीतून शिराळा येथे संध्याकाळी ६. ३०वा परतलो. कडक पाण्याने अंघोळ करून जे झोपलो तेरात्री ११. ३० वाजताच जागे झालो. सर्व अंग जोरात ठणकत होते कसे बसे चार घास खाऊन झोपलो ते सकाळी ८ वाजताच डॉ प्रदीप यांच्या फोननेच उठवले. सकाळी १०.३०वा दवाखाना, पेशंट असं रुटीन सुरु झाले.
मनात मात्र दोन दिवसात झालेला प्रवास, अडचणी, निसर्ग चिखल, पाणी, पाऊस, डोंगर रुंजी घालत होते. आपण हि पद भ्रमंती एव्हड्या वर्षात केली नाही याचे शल्य बोचत होते, पण आता येथून पुढे सर्व कुटुंब, मित्र परिवार, पै पाहुणे यांच्या सह जमेल तितकी वर्षे करण्याचा दृढ निश्चय केला. या ट्रेक मुळे एका जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.
जीवनात येणाऱ्या अनेक कटू – गोड प्रसंगांना सामोरे जाण्याची उर्मी मिळाली नवी मित्र मंडळी माणसे भेटली, समाजात मिसळता आले याचे खूप समाधान वाटले. छ. शिवाजी महाराज, बाजी प्रभू, शिवा काशीद, त्यांचे मावळे यांच्या बद्दलचे प्रेम, आदर, अभिमान वृद्धिंगत झाला आणि स्वतःची मानसिक शारीरिक क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली, जीवन जगण्याची नवी उमेद, ऊर्जा
मिळाली.
शिवरायांचे आठवावे रूप !
शिवरायांचा आठवावा प्रताप !
शिवरायांचा आठवावा साक्षेप ! भूमंडळी !!१!!
आयोजक श्री पंडितराव पोवार (अण्णा), तसेच डॉ किरण भिंगार्डे, डॉ प्रदीप पाटील यांचे मनःपूर्वक आभार, धन्यवाद
डॉ नितीन बा जाधव ३२ शिराळा