पालक, गुरूचे व्यक्तिमत्त्व अभिमानास्पद हवे
आबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
शिराळा, ता. १९ : मुलांना पालक व गुरुजनांचा अभिमान वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असावे, असे प्रतिपादन डॉ. आबासाहेब पाटील यांनी केले.
येथील सद्गुरू आश्रम शाळेतील निवासी तसेच मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी मेडिकल संघटना व जन्नत बँगल स्टोअर्समार्फत आरोग्य शिबिर झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव अध्यक्षस्थानी होत्या.
डॉ. पाटील म्हणाले, “मुलांमध्ये आदरयुक्त प्रेम असायला हवे. पालक व शिक्षकांनी त्यांच्याशी मित्रत्वाचा जिव्हाळा निर्माण करायला हवा. चुकांबद्दल समज देताना चांगल्या कामगिरीसाठी शाब्बासकीही द्यायला हवी. कुटुंबीयांनी पाल्याशी सातत्याने संवाद साधायला हवा. कष्ट, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व सचोटी ठेवण्यासाठी संवाद व समन्वय महत्त्वाचा ठरतो. वेळच्या वेळी आरोग्य व कौटुंबिक प्रसन्न वातावरण पाल्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरते.” यावेळी डॉ. प्रदीप काकडे यांचे भाषण झाले.
शिबिरात १०५ विद्यार्थ्यांवर मोफत तपासणी, औषधोपचार झाले. ग्रामपंचात सदस्य व आरोग्य समितीच्या अध्यक्षा मुमताज अत्तार यांच्यामार्फत मुलांना पेन्सिल, वही, गिरमीट, तर आपला बझारमार्फत प्रत्येकी एक बिस्किटांचा पुडा भेट देण्यात आला. वैद्यक संघटनेमार्फत औषधांचे मोफत वाटप झाले. यावेळी डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. एस. वाय. कुरणे, दस्तगीर अत्तार, डॉ. किशोर पतकी, डॉ. जयंत दाभोळे, प्रमोद काकडे, यशवंत जाधव, सुभाष खंडागळे, एम. डी. गायकवाड, डॉ. सौ. क्षमा पाटील, विनीत शहा, डॉ. प्रभाकर पाटील आदी
उपस्थित होते. विलास निकम यांनी आभार मानले.
दि. २०/११/०६