बोगस डॉक्टरांपासून सावध राहा : डॉ. नितीन
सकाळ वृत्तसेवा
शिराळा, ता. ८ : उपचारासाठी बोगस डॉक्टरांच्या हाती आपले शरीर देऊन आयुष्याचे नुकसान करू नका,असे आवाहन डॉ. नितीन जाधव यांनी
केले. येथे पंचायत समितीच्या सभागृहात जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती हणमंतराव पाटील होते. यावेळी जाधव म्हणाले, “लोकांनी स्वत साठी स्वतः च औषध घेणे टाळावे. आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये. प्रतिजैविकांचा व स्टेरॉईडचा अतिवापर
हा आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यासाठी वेळच्यावेळी योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्यामार्फत औषध घेणे गरजेचे आहे. बोगस डॉक्टरांमुळे अनेकांचेआयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे अशा लोकांकडे उपचारासाठी जाणेटाळले पाहिजे. यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज आहे. आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी आपल्याकडे आचार, विचार, आहार, विहार महत्त्वाचा आहे. आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण चांगल्या प्रकारे सुखी जीवन जगू शकतो.’
सभापती हणमतराव पाटील म्हणाले, ” बोगस डॉक्टरांच्या प्रमाणे आता बोगस औषधेही निघाली आहेत. लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा माणसाला विनाशाकडे नेतो. शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्वसामान्य लोकांच्यासाठी विविध योजना आल्या
आहेत. त्या योजनांचा लाभ त्यांनी घेणे गरजेचे आहे. सर्वसामान्य लोकांना लागणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पंचायत समितीमार्फत योग्य
ती मदत करू. डॉ. आनंदराव कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपसभापती आनंदराव पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल रोकडे, डॉ. दयानंद पाटील, डॉ. हृषिकेश चौगुले, आरोग्य विस्तार अधिकारी एस. एच. चौगुले, बी. आर. पाटील, श्रीमती के. बी.कुरणे, जे. एस. काळे, बी. आर. पाटील परिचारिका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. ए. बी. गायकवाड यांनी आभार मानले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ.नितीन जाधव. सोबत सभापती हणमंतराव पाटील, उपसभापती आनंदराव पाटील, डॉ. आनंदराव कांबळे, राहुल रोकडे व इतर.