मराठी गेय कवितेला संस्कृतीचा वारसा

मराठी गेय कवितेला संस्कृतीचा वारसा

काळंद्रे, ता. १८ : मराठी गेय कविता ही प्राचीन काळापासून चालत आली आहे. तिला प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. आज गेयतेकडे दुर्लक्षच होत आहे, असे मत कवी सुरेश मोहिते यांनी व्यक्त केले.
शिराळा तालुक्यातील काळंद्रे येथे दुसऱ्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. श्री. मोहिते म्हणाले, “ग्रामीण भागातील माणसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी ते संघर्ष करीत असतात. संघर्षातूनच माणसांना अनुभव मिळत असतात.
याच अनुभवातून दर्जेदार साहित्य निर्माण होत असते.” यानंतर सुरेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगले, कविसंमेलनात मोहिते यांनी ‘भोरड्या, सई, मुरवत, गजरचे घड्याळ’ अशा विविध कविता आपल्या लयदार ढंगात सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘कोंबड्यांचा बाजार झाल्यापासून’ ही कविता सादर करून माणसांमधला आळशीपणावर दृष्टिक्षेप टाकला. कवी वसंत पाटील यांनी धरणग्रस्तांची झालेली घालमेल आपल्या कवितेतून लोकांसमोर मांडली. त्यांनी ‘बऱ्याच वर्षांनंतर,’ ही कविता सादर केली.
कवी संजय पाटील यांनी ‘माझ्या वारणेच्या काठाला, नगारे वाजवी समृद्धीचे, तुरा उसाचा डोलतो पीक जोमात पैशाचे’ ही कविता सादर केली.
बाबासाहेब परीट यांनी वृत्तपत्रात ही कविता सादर केली. सामान्य माणसाविषयीची प्रसिद्धी दिली जात नाही, अशी खंत व्यक्त केली. नथुराम कुंभार यांनी ‘जुन्याचं नवं झालं’ ही कविता सादर करून दूरदर्शनमुळे समाजावर घातक परिणाम कसे होतात, याचे चित्रण मांडले. डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी ‘माझं मन उंडारते, जाईजुईच्या फुलात, ओसाड माळात, पहाटेच्या धुक्यात’ ही कविता सादर केली.
भिवा पाटील यांनी कोतवाल म्हणतो सांगतो ऐका’ ही कविता सादर केली. डॉ. शिवाजी चौगुले यांनी ‘बरं झालं महापूर आला” ही कवीता सादर केली. यावेळी, विष्णू पावले लक्ष्मण पवार, बसीर नदाफ, शामराव पाटील, संजय नायकवडी, भूषण कांबळे आदींनी कविता सादर केल्या.
कथाकथन सत्राचे बाबासाहेब परीट अध्यक्ष होते. त्यांनी ‘शिकार’ कथा सादर करून उपस्थितांचे निखळ विनोदातून मनोरंजन केले. सचिव अरुण खबाळे यांनी स्वागत केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी शामराव नामदेव पाटील, सरपंच सुमन सुतार, उपसरपंच आनंदा पाटील, सुभाष पाटील, बाळकृष्ण पाटील, जी. वाय. पाटील, संदीप पाटील, रमण खबाळे, संभाजी पाटील, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *