डोंगरी ओळख तालुका म्हणून असणाऱ्या शिराळा व शाहूवाडी तालुक्यात १९९४ पूर्वी आरोग्यासाठी चांगली सुविधा नव्हती. प्राथमिक उपचार ते ही १५ ते २० किलोमीटर अंतरावर मिळायचे. पुढील उपचारासाठी लोकांना कराड, इस्लामपूर, कोल्हापूर येथे जावे लागत होते. वेळेत निदान व उपचार नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र १९९४ ला डॉ.नितीन बाळासाहेब जाधव यांनी आनंद हॉस्पिटल सुरू करून रुग्ण सेवेतून रुग्णांचे जीवन आनंदी बनविण्याचे काम सुरू केले. ते अद्याप २८ वर्षे अविरतपणे सुरू आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्यात ग्रामीण भागात सेवा देणारे पहिले एम.डी.आहेत. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून एक सामाजिक बांधिलकी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण प्रेमी व एक गायक म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.
त्यांचे १९९० ला एम.बी.बी.एस. तसेच १९९४ ला एम.डी.मेडिसिन चे शिक्षण डॉ. व्ही. एम. एम. सी. कॉलेज सोलापूर, तर रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे ६ महिने काम केले. शिराळा व शाहूवाडी तालुक्यांतील वैद्यकीय सेवेचा अभाव पाहून त्यांनी शहरात न जाता आपल्या गावात व तालुक्यातील लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय सेवेचा असणारा अभाव आपण येथे हॉस्पिटल सुरू करून काही प्रमाणात कमी झाला तर हीच मोठी सेवा असेल म्हणून ऑगस्ट १९९४ ला त्यांनी शिराळा येथे आनंद हॉस्पिटल सुरू केले. शिराळा व शाहूवाडी तालुक्यांतील ग्रामीण भागात सेवा देणारे ते पहिले एम.बी.बी.एस.,एम.डी. डॉक्टर आहेत. १९९४ पूर्वी शिराळा व शाहूवाडी तालुक्यांत हृदय, मधुमेह, रक्तदाब,न्यूमोनिया, दमा, लकवा, फिट, क्षयरोग या आजारांच्या फक्त रुग्णांवरप्राथमिक उपचार होत. मात्र त्या नंतरया हॉस्पिटलच्या डॉ. जाधव यांनी सांगलीमाध्यमातून अशारुग्णांना वेळेत उपचार मिळू लागल्याने अनेक रुग्णांना जीवदान मिळू लागले आहे. त्यांच्या भविष्यातील धोके टळले. तालुक्यातील लोकांना शिराळा येथे येण्यासाठी जास्त वेळ व पैसा खर्च करावा लागू नये व त्वरित उपचार मिळावा म्हणून आठवड्यातील प्रत्येक शनिवारी कोकरूड, शेडगेवाडी, चरण येथील हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्यांची पत्नी डॉ.कृष्णा ह्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांची मोठी साथ जाधव यांना मिळत असल्याने या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार होण्यास मदत होत आहे.
ते फक्त वैद्यकीय व्यवसायापुरते मर्यादित न रहाता पर्यावरणप्रेमी म्हणून चांगले काम करत आहेत. त्यांनी पत्नी डॉ.कृष्णा यांच्या सहकार्याने पर्यावरणरक्षण, प्रदूषण, वनसंवर्धन, वृक्षारोपण हा उपक्रम हाती घेतला आहे.यासाठी शिराळा येथे स्वतःच्या दहा गुंठे जागेत मियावाकी जंगल निर्मिती केली आहे. या
ठिकाणी ६५० ते ७०० विविध प्रकारची रोपे व ७५ प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली आहे,यात फळ झाडे, फुल झाडे व औषधी वनस्पती यांचा समावेश आहे.तीन वर्षात २० ते २२ फूट उंचीची झाडे आहेत.
२० ते २२ फूट उंचीची झाडे आहेत. या ठिकाणी ३४ प्रकारचे पक्षी, कीटक, सरडे, साप आहेत, याची नोंद माझी वसुंधरा अंतर्गत नगरपंचायतने घेतली आहे. आता पर्यंत एक हजार पेक्षा जास्त निसर्गप्रेमींनी या मियावाकी जंगलास भेट दिली आहे. हा सांगली जिल्ह्यातील पहिला मियावाकी जंगल प्रकल्प आहे.
ग्रामीण भाग असल्याने उपचारापेक्षा अंधश्रद्धेवर जास्त भर असतो हे जाधव यांच्या लक्षात आले. त्यामुळे लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन हाती घेतले. गेले २२ वर्षे ते अंनिसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत असून त्यांनी कार्यकर्ता ते तालुका अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
जिल्हा व तालुक्यातील अंनिसच्या राबविण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आरोग्य, अंधश्रद्धा, वाचन चळवळ, थोर समाज सुधारक
शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, बसवेश्वर यांचे विचार समाजात पोहोचविण्याचे काम वेगवेगळे लेख व व्याख्यानांद्वारे सुरू आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या काळात शिराळा उपजिल्हा रुग्णालय येथे मुख्य फिजिशियन म्हणून काम करीत असताना जवळपास२००० रुग्णांवर उपचार केले आहेत. स्वस्तिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शिराळा व बांबवडे (ता.शाहूवाडी) चे प्रमुख संस्थापक आहेत.माणूस म्हटलं की त्याला कोणता ना
कोणता छंद असतो. जाधव यांना गायनाचा छंद आहे. केवळ छंद जोपासत नसून वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी उपांत्य विशारद ही गायनाची पदवी त्यांनी घेतली आहे. त्यांना नाट्यसंगीत, सिनेसंगीत, उपशास्त्रीय गायन कला अवगत आहे. त्यांच्या गायनाचे स्वरगंधार माध्यमातून कार्यक्रम होत असतात. जाधव यांनी आपल्या वैद्यकीय व्यवसायात खंड पडून न देता त्याच उमेदीने जोपासलेले वेगवेगळे छंद वाखाणण्याजोगे आहेत.