शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय
शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
शिराळा तालुक्यात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी दिली.
वैद्यकीय क्षेत्रात निदान, उपचार पध्दतीमध्ये नवनवीन शोध लागत आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत सर्व अद्ययावत ज्ञान पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून ही सी. एम. ई आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील जवळपास १५० पेक्षा जास्त डॉक्टर सहभागी होणार आहेत. मार्गदर्शन करण्यासाठी तीन तज्ज्ञ येणार आहेत. यामध्ये लहान मुलांमधील अपस्मार (फिटस् /आकडी) या विषयावर डॉ. शरद घाटगे, स्त्रियांमधील सर्वसामान्य आजार व आरोग्यविषयक समस्या यावर अद्ययावत उपचार पध्दती डॉ. सौ. प्रीती देशपांडे तर त्वचाविकार (मुरमे, नायटे, बुरशी) यांचे निदान व आधुनिक औषधोपचार या विषयावर डॉ. धनंजय चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम शिराळा मेडिकल असोसिएशन आणि इप्का लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता लोकनेते फत्तेसिंगराव नाईक लायन्स क्लब सेवा केंद्र, भाटशिरगाव’ येथे होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील डॉक्टरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप काकडे व सचिव डॉ. सौक्षमा पाटील यांनी केले आहे.
तरुण भारत गुरुवार, १५ मार्च २००७