सोनोग्राफी यंत्रणा वरदान, पण तिचा स्त्री भ्रूणहत्येसाठी गैरवापर
डॉ. सौ. कृष्णा जाधव यांची खंत
शिराळा, दि. १७ (वार्ताहर) : स्त्री जातीवर भारतीय कुटुंबव्यवस्थेने हत्त्येसाठी शस्त्र उगारले आहे. सोनोग्राफी हे आरोग्य चिकित्सेतील वरदान आहे, पण या यंत्राद्वारे स्त्री गर्भाची कत्तल सुरू असल्याची खंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केली.
दुरंदेवाडी (औंढी, ता. शिराळा) येथे समाजप्रबोधिनी, परिवर्तन प्रयोग परिवारातर्फे ‘गर्भलिंग परीक्षणाचे दुष्परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
डॉ. सौ. जाधव म्हणाल्या की, सांगली जिल्ह्यात १००० पुरुषांमागे ८२२ स्त्रियांचे प्रमाण आहे. गर्भजल परीक्षेमुळे तुम्ही डॉक्टरांना खुनाची सुपारी देत आहात. स्त्रीला जगवा तरच तुम्ही जगाल, बाळाला. आई, भावाला बहीण, पतीला पत्नी नको का? कायद्यापेक्षा समाजप्रबोधनानेच हे सामाजिक अरिष्ट टळेल, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. नितीन जाधव यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शामराव खोत, रघुनाथ खोत, संदीप खोत, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. विजयकुमार गोरवे, सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केले. आभार शंकर पाटील यांनी मानले.