स्त्री-भ्रूणहत्येविरोधात समाज
डॉक्टरांनी संघटित काम करावे
कृष्णा जाधव यांचे मत
शिराळा: “स्त्री-भ्रूण हत्या ही सामाजिक गंभीर समस्या बनली आहे. त्याविरोधात समाज व डॉक्टरांनी संघटितपणे काम करण्याची गरज आहे,” अशी अपेक्षा तालुका मेडिकल संघटनेच्या अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव यांनी व्यक्त केली.
भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सांस्कृतिक केंद्रात तालुका मेडिकल संघटना लॅबोरेटरी’ मार्फत ‘सी.ई.एम-२००७’ कार्यक्रम झाला. शिराळा, शाहूवाडी, वाळवे तालुक्यातील सुमारे १२५ डॉक्टर सहकुटुंब उपस्थित होते. त्या वेळी डॉ. सौ. जाधव बोलत होत्या. त्या म्हणाल्या, “समाज आणि डॉक्टर यांच्यातील संबंध दुरावत चालले आहेत. डॉक्टरांच्या जीवनातील ताण-तणाव, समस्या, नवीन उपचार पद्धतीसाठी ‘सीईएम’सारखे उपक्रम राबविण्याची गरज आहे.
सांगलीचे बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद जाधव यांनी लहान मुलांना येणारी चक्कर (फिट) विविध प्रकार व त्यावरील उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कऱ्हाडच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सौ. प्रीती देशपांडे यांनी स्त्रियांमधील वयानुरूप होणारे बदल, आजारांचे निदान व
उपचारपद्धतीची माहिती दिली. डॉ. धनंजय चव्हाण यांनी त्वचारोग, सौंदर्य, मुरमे, व्रण, चामखीळ, शरीरावरील अनावश्यक केस व डाग या बाबतचे प्राथमिक उपचार, लेसर उपचार पद्धती, क्रायो शस्त्रक्रियेबाबतची माहिती दिली. डॉक्टर व रुग्णांमधील विनोदी प्रसंग साभिनय सादर केले. शरयू जाधव हिने स्वागतगीत म्हटले. डॉ. सौ. जाधव, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप काकडे, सचिव डॉ. सौ. क्षमा पाटील, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. धनंजय चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन झाले.
डॉ. सौ. जाधव यांनी अहवालवाचन केले. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजय पाटील यांना केंब्रिज (इंग्लंड) येथील इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर यांच्याकडून ‘हेल्थ प्रोफेशनल ऑफ द इअर’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचा डॉ. जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. डॉ. ए. जी. पाटील, डॉ. एस. वाय. कुरणे, प्रमोद काकडे, डॉ. अरुण पाटील, डॉ. आबासाहेब पाटील, डॉ. अजय काळे, डॉ. राजाराम पाटील यांनी संयोजन केले. डॉ. सौ. ज्योती पाटील, डॉ. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष डॉ. काकडे यांनी आभार मानले.