हम भी कुछ कम नहीं..
डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद
प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. मात्र, तो अखंडित जोपासण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते घेणारा गुरगुरतो, असे म्हटले जाते. मनात आणले तर शिक्षणाचे दूध घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, हे शिराळा येथील प्रसिद्ध डॉ. नितीन जाधव यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय (मुंबई) या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी त्यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी मिळवून ‘हम भी कुछ कम नहीं…’ हे सिद्ध करून दाखवले आहे. वैद्यकीय क्षेत्रात असताना ही संगीत विशारद ही पदवी मिळवणारे
शिराळा तालुक्यात ते पहिले डॉक्टर आहेत.
– शिवाजीराव चौगुले.
डॉ. नितीन जाधव हे शिराळा येथे गेली वर्षे २९ एम.डी. मेडिसिन म्हणून कामकरत आहेत. गायनकला ही त्यांच्या कुटुंबात आहे. त्यामुळे त्यांना त्याचे
बाळकडू लहानपणापासून मिळाले आहे. त्यांचे आजोबा शाहीर दिवंगत गणपतराव जाधव यांचा सांस्कृतिक वारसा त्यांना मिळालेला आहे. डॉ.जाधव यांचे या क्षेत्रातील प्रारंभीचे शिक्षण काका दिवंगत विश्वासराव ऊर्फ बबनराव जाधव यांच्याकडे झाले. तसेच इस्लामपूर येथील पं. हणमंतराव जाधव यांच्याकडे सतत पंधरा वर्षे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रेरणेनेच गायनाने प्रभावी होत जाऊन त्यांना योग्य दिशा मिळाली. ते संगीतालंकार विजय दळवी यांच्याकडे गेली सात-आठ वर्षे संगीताचे शिक्षण घेत आहेत. संगीताचे शिक्षण घेत असताना पं. अशोक कुलकर्णी (कडेगाव), कैलास सावंत, वंदना कांबळे, संगीत अलंकार पंडित लोहार (पेठ), तबला अलंकार, गायन विशारद संतोष अंगापूरकर (तळसंद) यांची महत्त्वाची मदत व मार्गदर्शन मिळाले.
या संपूर्ण प्रवासात त्यांना तबल्याची साथसंगीत तबला विशारद सतीश पाटील (इस्लामपूर), संगीत तबला विशारद केदार चव्हाण, शशांक चव्हाण (शिराळा), तसेच स्वरसाधना स्टुडिओचे रेकॉर्डिंग विक्रम दाभाडे, उल्हास कांबळे, पी. एस.कांबळे यांची साथ मिळत आहे. आपणाकडे कला आहे. ती कला जोपासत असताना त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण व्हावे आणि त्याची पदवी मिळावी, या उद्देशाने डॉ.जाधव यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत या परीक्षा देऊन संगीत क्षेत्रातील पदवी वयाच्या ५४ व्या वर्षी मिळवून एक वर्गाला आदर्श निर्माण केला आहे. सध्या ते स्वरगंधा ग्रुपच्या माध्यमातून गायनाचे विविध कार्यक्रम करत आहेत. यासाठी त्यांना पत्नी डॉ. कृष्णा यांची विशेष साथ मिळत आहेत. आपल्या गायनकलेचा व वैद्यकीय व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी घेत जाधव कुटुंबीयांनी हा गायन वारसा जोपासला आहे.