शिराळा:
नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळाली.सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला, माझ्या अत्याधिक व्यस्त अशा वैद्यकीय कामाच्या व्यापातून वेळ काढून संगीत साधना करणे हा माझा आवडता
छंद पण विशारद परीक्षेसाठी तयारी करणं सतत अभ्यास आणि अथक रियाज करणं सोपं मात्र नव्हतं. संगीतातील सप्तसूर म्हणजे सप्तसागरच आहेत याची प्रचिती आली. संगीत विशारद पूर्ण करण्याच्या माझ्या आंतरिक इच्छेने व जबरदस्त चिकाटीने ते शक्य झालं पण केवळ माझ्या प्रयत्नांचे हे यश नव्हे अत्यंत प्रभावी असा सांगितिक वारसा मला लाभला आहे. माझे आजोबा परमपूज्य कै. गणपतराव जाधव उत्तम शाहीर होते. त्यांचं स्वतःचं भजनी मंडळ होतं त्यांची शाहिरी ऐकण्याचं भाग्य लाभलेल्या अनेकांनी त्यांच्या खणखणीत दमदार आवाजाची तोंड भरून केलेली वाखाणणी आम्ही ऐकली आहे.
माझे जेष्ठ काका कै. विश्वासराव उर्फ बबनराव जाधव शास्त्रीय गायक होते नाट्य संगीतात त्यांचे विशेष स्थान होते. ते सांगली आकाशवाणी केंद्राचे मान्यता प्राप्त गायक कलाकार होते. माझे प्रारंभीचे संगीत शिक्षण माझ्या काकांकडेच झाले.इस्लामपूर येथील पंडित हणुमंतराव जाधव (पप्पा)यांच्याकडे सतत पंधरा वर्षे मला बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या आज पर्यंतच्या प्रेरणेनेच माझे गाणे प्रभावी होत गेले व मला योग्य दिशा मिळाली त्यानंतर पंडित अशोक
कुलकर्णी (कडेगाव) श्री कैलास सावंत, सौ वंदना कांबळे यांनीही मार्गदर्शन करून माझ्याकडून उत्तम सराव करून घेतला गेली सात ते आठ वर्ष संगीत अलंकार श्री विजय दळवी सर यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे. आदरणीय संगीत अलंकार श्री पंडित लोहार सर (पेठ), तसेच तबला अलंकार, गायन विशारद श्री संतोष अंगापूरकर सर (तळसंद ) यांचीही खूप मोलाची मदत व मार्गदर्शन लाभले. गाणं म्हटलं की हार्मोनियम व तबल्याची साथ हवीच. तबल्याची साथ करणारे संगीत तबला विशारद श्री सतीश पाटील इस्लामपूर, संगीत तबला विशारद श्री केदार चव्हाण शशांक चव्हाण शिराळा तसेच
स्वर साधना रेकॉर्डिंग स्टुडिओचे विक्रम दाभाडे, उल्हास कांबळे पी एस कांबळे सर यांची मोलाची साथ मिळत होती. अशाप्रकारे देणाऱ्यांच्या हजारो
हातांनी माझी झोळी भरत गेली.माझा रियाज चालू असताना माझे पेशंट्स हॉस्पिटलची आणि घराची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर सौ कृष्णाने समर्थ पणे सांभाळली माझ्या या यशात त्यांचे योगदान मोलाचे आहे.
वेळोवेळी माझा हुरूप वाढवून माझी अनेक टेन्शन्स कमी करण्यात तरबेज असलेल्या आमच्या दोन्ही मुली शरयू आणि शर्वरी यांच्या प्रोत्सानामुळे, प्रेरणेमुळे तसेच माझ्या प्रत्येक कार्यात माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आनंद हॉस्पिटलच्या
सर्व स्टाफ, सहकारी यांच्या पाठबळामुळे तसेच माझी आई कै. कुसुम व वडील कै. बाळासाहेब जाधव (तात्या) यांच्या आशीर्वादामुळेच मी संगीत
विशारद ह्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदवीला गवसणी घालू शकलो.