विवेकाच्या लढाईसाठी साहित्याची गरज
वैजनाथ महाजन यांचे मत
काळंद्रे, ता. १६ : विकाराच्या विरोधात विवेकाची लढाई खेळण्यासाठी साहित्याची गरज असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. काळंद्रे येथील वारणा सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सुरवातीला गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. बाबूराव माळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रा. महाजन म्हणाले, “सध्या इंग्रजीचे आक्रमण मराठीवर झाले आहे. तेव्हा सकस आणि सरस साहित्याची गरज आहे. आज टी.व्ही. चॅनेलने समाजावर मोठे आक्रमण केले आहे. मुलांनी वाचनाचा ध्यास घेतल्याशिवाय लिहिण्याचे वेड लागणार नाही. फक्त डोळे फिरवले म्हणजे वाचन होत नाही. लिहिता लिहिता हरवत जाण्यासाठी साहित्य संमेलने हवीत.”
साहित्य संमेलनात तरुणांबरोबरच वृद्ध माणसांचा सहभाग पाहिल्यानंतर प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले, “पिकत चाललेले वृद्धत्व व हिरवी कच्ची तरुणाई हातात हात घालून फिरताना पाहिली आणि मनस्वी आनंद झाला. तरुण आणि वृद्ध यांचा समन्वय साधेल तेव्हाच गावात एकीचे बळ निर्माण होईल आणि अशी एकी वारणा साहित्य मंडळाने दाखवली आहे.” यावेळी मंडळाच्या वतीने निमंत्रितांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन अरुण खबाले यांनी केले, तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले. प्रा. सुरेश मोहिते, बाबासाहेब परीट, वसंत पाटील, डॉ. शिवाजीराव चौगुले, डॉ. कृष्णा जाधव, बाळकृष्ण पाटील, वसंत विष्णू पाटील, शामराव पाटील, संभाजी पाटील, संदीप पाटील, राजेंद्र पाटील, रमण खबाले, वासंती माळी, पोलिस निरीक्षक अशोक ढवळे, मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दै. सकाळ १७ मे 2006.