शारीरिक, मानसिक आरोग्याची
महिलांनी काळजी घ्यावी
कृष्णा जाधव यांचे मत
शिराळा, ता. १३ : जीवनाच्या जाताना महिलांनी शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले.
येथील (कै.) डी. के. हसबनीस प्रतिष्ठान, स्वरूप लॅबोरेटरी व मेडिकल संघटनेमार्फत आज झालेल्या महिला आरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या. डॉ. सौ. सुषमा देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या.
जाधव म्हणाल्या, “मुलगी वयात आल्यानंतर आईने तिची काळजी घेणे गरजेचे आहे. आईने तिच्याशी मैत्रिणीचे नाते निर्माण करावे. त्यामुळे मुलगीला तिला येणाऱ्या अडचणी, गैरसमज आदींबाबत आईशी चर्चा करता येईल. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गर्भ तपासणीच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न भेडसावत आहे. या बाबत शासन व नारिकांनीची काळजी घेणे गरजेचे आहे.”
डॉ. देशपांडे म्हणाल्या, “महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नासाठी शिबिराच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.
असे कार्यक्रम भविष्यात सुरू राहावेत. मन सातवे इंद्रिय आहे. ते सशक्त असल्यास शरीर तंदुरुस्त राहते. सध्याची जीवनशैली बदलण्याची गरज आहे.”
प्रारंभी (कै.) हसबनीस प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. सौ. अनिता कुलकर्णी यांनी स्वागत केले. उपस्थित महिलांनी विचारलेले प्रश्न व शंकांचे समाधान उपस्थित डॉक्टरांनी केले. येथील तरुण मित्र मंडळ वाचनालयात शिबिर झाले. सौ. आशा नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. वैजयंती हसबनीस यांनी आभार मानले.