स्त्रीभ्रूणहत्येमुळे मानवजात संपण्याची भीती
कृष्णा जाधव यांचे प्रतिपादन
शिराळा,ता. १७ स्त्रीभ्रूणहत्येच्या माध्यमातून भारतीय कुटूंब व्यवस्थेने स्त्रीच्या हत्येसाठी शस्त्र उगारले आहे. या शस्त्राने संपूर्ण मानवजात संपण्याची भीती आहे, असे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले.
औंढीपैकी दुरंदेवाडी (ता. शिराळा) येथे समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तन प्रयोग परिवार शिराळामार्फत डॉ. सौ. जाधव यांचे ‘गर्भलिंग परीक्षणाचे दुष्परिणाम’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. नितीन जाधव अध्यक्षस्थानी होते.
डॉ. सौ. जाधव म्हणाल्या, “सोनोग्राफी हे आरोग्य चिकित्सेतील वरदान आहे; पण या यंत्राचा वापर करून स्त्री गर्भाची कत्तल केली जात आहे. वंशाला दिवा हवा. रामाच्या जोडीला लक्ष्मण पाहिजे. घराण्याचे नाव चालवायला पुरुष हवा, असा अट्टहास असतो; पण पुरुषाला जन्म स्त्रीमुळे मिळतो, हे आपण सोईने विसरतो. छत्रपती शिवाजीमहाराजांना घडविणारी जिजामाता महिलाच होती. झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, अहल्याबाई होळकर, कल्पना चावला यांनी इतिहास निर्माण केला. स्त्रीच्या सांगण्यावरून स्त्रीच्या गर्भाची हत्या होत आहे. गर्भातही स्त्री असुरक्षित आहे. स्त्रियांची संख्या कमी झाल्यास जीवन असुरक्षित बनेल. त्यांच्यावरील अत्याचार वाढतील. स्त्रियांना घराबाहेर पडणे अवघड होईल. हरियानात चाळिशी गाठली तरी लग्नासाठी मुली मिळत नाहीत. जिल्ह्यात हजार पुरुषांमागे ८२२ स्त्रियांचे प्रमाण आहे. गर्भजल परीक्षेच्या माध्यमातून आपण डॉक्टरांना खुनाची सुपारी देत आहोत. कायद्यापेक्षा समाज प्रबोधनाने हे आरिष्ट टाळता येईल.”
प्रारंभी विजयकुमार जोखे यांनी प्रास्ताविक केले. व्याख्यानानंतर आम्ही गर्भजल तपासणी करणार नाही, अशी प्रतिज्ञा ग्रामस्थांनी केली. डॉ. जाधव यांचे मनोगत झाले. शामराव खोत, रघुनाथ, संदीप आदी सुमारे दोनशेवर महिला पुरुष उपस्थित होते. शंकर पाटील यांनी आभार मानले.
१८ मे दे. सकाळ